अकोला : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज 9 ऑक्टोबरला पहाटे जिल्ह्यातील पातूर तालुक्यात आलेगाव येथे घडली. ओबीसी नेते विजय बोचरे असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नावे त्यांनी एक पत्र लिहून ते आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवले. त्यामध्ये त्यांनी सरकारने ओबीसींना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला आहे.
राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मूळ ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यावरून सकल ओबीसी समाजाने देखील आता आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येते. या सर्व प्रकरणावरून अकोला जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, जातीय जनगणना झाली पाहिजे असे पत्रामध्ये नमूद करीत अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील विजय बोचरे (59) यांनी आज पहाटे आलेगाव बसस्थानकावरील प्रवासी निवाऱ्यात गळफास घेत आपले जीवन संपवले.
सकाळी ही घटना उघडकीस येताच संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी चान्नी पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.